परमपूज्य नामचैतन्य भानुदास (भाऊ)

श्रीयुत चंद्रकांत ठाकूरदास, ज्यांना आदरयुक्त प्रेमाने 'भाऊ'या नावाने जग ओळखतं, त्यांनी मनावर ३६ वर्षे अथक संशोधन केलं. त्यातून त्यांना काही ठोस निष्कर्ष हाती आले. सर्व भौतिक सुविधांची रेलचेल असूनही माणूस आनंदी का नाही? या प्रश्नाचे उत्तर आणि त्यावर अचूक उपाय ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या या संशोधनाचे फलित आहे असं म्हणल्यास अतिशयोक्ती नाही. केवळ फलित हाती घेऊन न थांबता त्यांनी ते पडताळून पाहण्यासाठी राजा शिवाजी विद्यालय, दादर, पूर्व या ठिकाणी प्रौढांसाठी विज्ञान प्रबोधिनी १९९५ पासून सुरू केली. ही प्रबोधिनीच्या माध्यमातून माणसांच्या मनाच्या विविध अवस्था दाखविणारी एक प्रयोगशाळाच त्यांच्या समोर आली. आपल्या संशोधन कार्यातून हाती आलेले निष्कर्ष कोणताही पडदा न ठेवता त्यांनी समाजासमोर मांडले. ज्याची जशी अवस्था तशी त्याची गरज. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडत गेलं. अल्पावधीतच लोक आनंदी जीवनाची वाटचाल करू लागले. या प्रबोधिनीत सर्व स्तरामधील, विविध कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी असलेल्या आबालवृद्ध व्यक्तींचा समावेश होता. या विभिन्नतेमध्ये आनंदी मनाची अवस्था हा एक समान धागा होता. हे सर्व पाहून परमपूज्य भाऊंना जाणवलं की कोणत्याही वयाच्या टप्प्यावर व्यक्ती मनाच्या या विज्ञानाच्या आधारावर आमूलाग्र बदलू शकते.