भजनांचे बोल
गुरुंची चरणपूजा
मी चरणपूजा मांडियली। गुरुची चरणपूजा मांडियली॥धृ॥
निर्मळ मनीचे निर्मळ पाणी। सतत धार धरियली॥१॥
पंचप्राणाचे पंचामृत हे। सद्गुरु चरणे अधर चोळिली॥
पंचप्राणांच्या शुद्धिकरिता। पुन्हा धार धरियली॥२॥
सत्वगुणाचे गंध लेपुनी। रजोगुणी हळदही लाविली॥
तमोगुणाची पिंजर वरती। भावाक्षता वाहियली॥३॥
भाव फुलांचे गुच्छ बांधिले। सत्कर्मांची फुले विखुरली॥
नामजपाचा हार गुंफुनी। गुरुपदे सजविली॥४॥
प्रेम, नम्रता गंधाकरिता। द्वेष, दंभाची बत्ती लाविली॥
लोभ, मोहाचा कर्पूर जाळुनी। त्याग, विरक्ती साधियली॥५॥
काम-क्रोधाचा धूप घालुनी। वैराग्य शांती, मनी पसरली॥
दोषयुक्त ते रिपू पेटवुनी। प्रसन्नता दरवळली॥६॥
भाव-भक्तीचा प्रसाद दावुनी। दृढश्रद्धा ही त्यात ठेविली॥
प्राणज्योत तेविली निरांजनी। भानुदासे ओवाळिली॥७॥
भक्तांना जवळ करा
भक्तांना जवळ करा हो स्वामीराया। आम्हाला आपले म्हणा हो स्वामीराया॥धृ॥
परब्रह्म तुम्ही, परमगुरूही तुम्ही।
सद्गुरू स्वरूपी तुम्हा पाही मी॥
जीवन सरले तुमच्या नामी।
आता दर्शना व्याकुळलो मी॥१॥
परमदाळू नी परमकृपाळूही।
भक्त मानिती तुम्हा सर्वही॥
भानुदासही येवो कामी।
ब्रीद राखण्या या हो स्वामी॥२
अहो विसावले मन माझे
अहो विसावले मन माझे। स्वामींच्या चरणी॥धृ॥
आता नाती गोती जोडू नका, बोलू नका कोणी॥१॥
सार्या वृत्ती प्रवृत्तींचा खेळ। थांबला कृपाळा॥
अनुभविला स्वामीराया। आगळा सोहळा॥२॥
तुझ्या मायेच्या कुशीची आस। वात्सल्यवर्षाव॥
धन्य झाला भानुदास। तुझ्या पदी ठाव॥३॥
स्वामी आले माझ्या घरी
स्वामी आले माझ्या घरी हो। स्वामी आले माझ्या घरी॥धृ॥
द्वंद्व द्वैताचे शमले, सारे अद्वैत जहाले।
पूर्ण प्रकाश स्वरूपी, जैसे नादब्रह्म न्हाले॥१॥
सार्या पंचमहाभूता ठायी, परब्रह्म आले।
आता काही ना उरले, सारे स्वामीमय झाले॥२॥
मूळ चैतन्य परमतत्त्व, भूमिवरी आले।
स्वामी अंतर्बाह्य भानुदासा, व्यापुनी उरले॥३॥
कोंडिला देव मन मंदिरी
कोडिला देव मन मंदिरी। वृथा का शोधू संसारी॥धृ॥
क्षेत्र हे चालते बोलते। नामी ज्या नाचते डोलते॥१॥
ह्रदय हे देवाचे मंदिर। आनंदी राहे विश्वंभर॥२॥
देहाची झाली पुण्यभूमी। वाजवी टाळ मृदुंग मी॥३॥
जाहला भानुदास दंग। नाचतो अंतरी श्रीरंग॥४॥
नामावरी भार
नामावरी भार, भार वाहे नाम। नामात उद्धार मानवाचा॥धृ॥
मनाचा हा खेळ, खेळ अध्यात्माचा।
अध्यात्मे साधिला परमानंद॥१॥
जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल
परमानंदी देव, चिरसमाधानी।
तेथ जाण दैवी साक्षात्कार॥२॥
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
साक्षात्कारी तोचि, नुरे चित्तवृत्ती।
अद्वैत प्रवृत्ती परमात्मशी॥३॥
जय गुरुदेव, श्री गुरुदेव
सद्गुरू समर्थ, दावी एक तत्त्व।
भानुदास सत्य मांडितसे॥४॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
वेड लागले नामाचे
वेड लागले नामाचे, नाम निर्गुण निराकार।
ताल-सुरांच संगती, नाचे नामाचे अक्षर॥धृ॥
नाही देवाचे स्मरण, पडे देहाचा विसर।
मन विरले नामात, उरे नामाचा गजर॥१॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
गेले काळाचेही भान, गेला स्थळाचा आधार।
त्यात उरले सुरले, सारे चित्त नामावर॥२॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
असा नामाचा महिमा, करी जीवाचा उद्धार।
भानुदासाने मांडिला नित्य नामाचा संसार॥३॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
नाही पंथ कुठला
नाही पंथ कुठला, नाही कोणता धर्म।
माणसाच्या जीवनाचे, माणुसकी मर्म॥धृ॥
आधी जन्मला मानव, त्याने घडविला धर्म।
धर्माच्या जंजाळात, विसरला कर्म॥१॥
सर्वधर्म शिकविती, विश्वबंधुभाव।
कशासाठी बनसी पशू तू, कशाची ही हाव॥२॥
नको करू भेदाभेद, तत्त्व ते अभेद्य।
शक्ती असे एकच वेड्या, रूपे ती अनेक॥३॥
नाही राम, अल्ला, ख्रिस्त, नाही बुद्ध झरतृष्ट।
दिव्य सुप्त शक्तिवरती, ठेव तुझी भिस्त॥४॥
निर्गुण जो निराकार, नामरूपी जो ईश्वर।
भानुदास सांगे सखया, दिव्य होई साक्षात्कार॥५॥
जग चालले चालले आता
जग चालले चालले आता, नरकाच तळा।
तुम्ही प्रवाहाच्या भोवर्यात, तुम्हाला सांभाळा॥धृ॥
व्याभिचार, भ्रष्टाचारा येईल उफाळा।
सुसंस्कार, नीतिमत्ता, जाळतील ज्वाळा॥१॥
मानवाचा जीव घेणे, मानवाचा चाळा।
शिवाला जीवाचा काही, येईना उमाळा॥२॥
नामाचीच नाव आता, तारील सकळा।
भानुदास नित्य देई, नामाला उजाळा॥३॥
रौरवत्या जीवनाची
रौरवत्या जीवनाची नाही कुणा खंत।
कुणासाठी केला देवा जीवाचा आकांत॥धृ॥
देवा तुझ्या मायेमध्ये सारे गुंगतात।
कशासाठी मिथ्या म्हणती वेडे साधू संत॥१॥
आप्त इष्ट नातीगोती मायेच्या प्रेमात।
नाकळाले देवा तुची प्रेम मूर्तीमंत॥२॥
क्षणोक्षणी षड्ररिपू वाढे मायाबाजारात।
दया, क्षमा, शांती देवा तुझ्या अंतरात॥३॥
आता देवा भानुदासा नाही सोसवत।
मायेच्या या विळख्यातून मला घ्या कुशीत॥४॥
सोनिायाचा जन्म
सोनियाचा जन्म तुम्हा, अर्पिला सारा।
जन्मभरी केला स्वामी, नामाचा भंडारा॥धृ॥
खुले केले जगतासाठी, ज्ञानाच्या भांडारा।
चिमुकले हात माझे, किती भरू चारा॥१॥
चहुकडे का हो पसरला, मायेचा पसारा।
इवलासा जीव माझा, होई कोंडमारा॥२॥
भानुदास आर्जव करण्या, आला तुमच्या दारा।
त्वरा करा स्वामीराया, जीवाला उद्धारा॥३॥
झाकळले चैतन्य
झाकळले चैतन्य, आकळेना ब्रह्म।
बुद्धी, मन, अंतर्मन, करितसे भ्रम॥धृ॥
देहभान जपता जपता, देहभाव स्थिरावला।
देहभावे देहा मना, अहंभाव चिकटला॥१॥
सदासर्व मी मी म्हणता, मनी दुजाभाव रुजला।
बाह्यात्कारी द्वैतामाजी, मनोमनी ठेचाळला॥२॥
षड्ररिपू विकारी मन, आवरी तयाच्या छंदा।
भानुदास सांगे सखया, नको मुकू परमानंदा॥३॥
मन रे, काहे होश सँवारा
मन रे, काहे होश सँवारा॥धृ॥
बाल अवस्था सबपर निर्भर, गयी जवानी बीत।
वृद्धकाल मे अंतसे डरकर, क्या खोजे प्रभू-प्रित॥१॥
दंभ-द्वेष से क्लेश बढाकर, लोभ मोह की खींच।
काम-क्रोध की आग लगाकर, क्यूँ रोये उस बीच॥२॥
मोह जाल मे रहना फँसकर, यही जगत की रीत।
भानुदास माया से हटकर, गाये प्रभू-गुन गीत॥३॥
मन रे, काहे होत उदास॥
जीवन व्यर्थ गँवाया
मनुवा जीवन व्यर्थ गँवाया॥धृ॥
झूठे जग की झूठी माया।
भ्रम मे काल बिताया॥१॥
जीवन भर मे कछु नही पाया।
जो पाया वो खोया॥२॥
मूरख मन को स्वैर बनाया।
फिर भी ना पछताया॥३॥
हरी भजन बिन, सब गुन गाया।
मूख मे नाम ना आया॥४॥
साधू संत ने सत्य दिखाया।
मूरख समझ न पाया॥५॥
भानुदास कहे व्यर्थ ही जिया।
जो नर हरी बिन सोया॥६॥
रक्षा बंधन
सांप्रदाय अन् धर्म पंथांची नाती ही तोडली।
आम्ही तर मानवता जोडली॥धृ॥
माणुसकीचे रेशमी बंधन। राखी बांधिली सद्भावातून॥
परमपित्याची उज्ज्वल रूपे। मानवात पाहिली॥१॥
नरदेहाचे सार्थक जाणून। नर होऊ दे श्रीनारायण॥
भानुदास म्हणे या जीवांची। गाथा मी गायिली॥२॥
बाळ बोबडे
बाळ बोबडे दुडुदुडु चाले। थोडेसे कौतुक करा ना॥
गुरुदेवा कडेवर उचलून घ्या ना॥१॥
वाट वळणाची, खाच खळग्याची। आता पुढे चालवेना॥
गुरुदेवा हाताने आधार द्या ना॥२॥
शरीर थकले, पायी फोड आले। खाली पाऊल टेकवेना॥
गुरुदेवा अलगद उचलून घ्या ना॥३॥
भानुदास म्हणे व्यर्थ हे जिणे। षड्ररिपू सुटता सुटेना॥
गुरुराया आता वर उचलून घ्या ना॥४॥
होरी
होरी खेलन घर आये, हाय शाम॥धृ॥
भक्तिभरी पिचकारी जो डारी।
मोहे भिगी भिगी किेये, हाय राम॥१॥
प्रेम गुलाल की लाली चढायी।
’मोहे लालेलाल किेये हाय राम॥२॥
आनंद गंध का केसर घुलाई।
मोहे केसरी कर दिेये, हाय राम॥३॥
शांती नीली नील शाम लगाई।
मोहे शामलवर्णी किेये, हाय राम॥४॥
ऐसी रंगे रंग होरी रचायी।
नाचे भानुदास गाये, हाय राम॥५॥
माणसाच्या पोरा
माणसाच्या पोरा उशीर झाला बाबा उशीर झाला।
जल्माला येऊन फुकट ग्येला॥धृ॥
पूजा पाठामधी तू रमला। अन् पोथी पुराणात का गुंगला॥
उपाशी र्हाऊन जीव जाळला। पन् देवळात न्हाई तुला देव घावला॥१॥
एक, दोन, तीन, चार। तुला पंचप्राणाची न्हाई रे जाण॥
मुखानं म्हणशी हरे कृष्ण राम। पन् तुला न्हाई भेटला आत्माराम॥२॥
ब्रह्मदेवाने डाव रचला। अन् चक्रव्हीवामधी तू गुतला॥
सद्गुरुनाथाने भेद केला। अन् भानुदासाला ही दाविला॥३॥
माया आली रे आली
माया आली रे आली, अरे देवादिकांनाही नडली॥धृ॥
सार्या जगावर थैमान घाली। योगी, ॠषी-मुनींनाही भोवली॥
सार्या जगात पिंगा घाली। राजा रंकावर मोहिनी घाली॥१॥
नाही शास्त्री पंडितांना कळली। नाही कधी कुणालाही दिसली॥
बा घराघरामध्ये घुसली। मनामनाची शांतीच गेली॥२॥
तिच्या लीलेने उन्मत्त झाली। परी कुठेतरी माया फसली॥
साधू संतांना सोडून गेली। भानुदासाने विशद केली॥३॥
टोपी घालू नका
अहो तुम्ही, टोपी घालू नका।
कुणीही टोपी भालू नका। कुणाला टोपी घालू नका॥धृ॥
टोपीवाले टोपी घालून। दुसरी उडवू नका॥१॥
टोपीवाले टोपी घालून। टोपी फिरवू नका॥२॥
टोपीखाली डोके झाकून। बुद्धी लढवू नका॥३॥
दुसर्याचाही टोपीसाठी। मत्सर करू नका॥४॥
टोपीलाही तुरा लावुनी। राजे बनू नका॥५॥
टोपीसाठी धोबी शिंपी। पैसा हुडकू नका॥६॥
टोपीखाली क्रोध पेटवुनी। टोपी जाळू नका॥७॥
खाली अनिती, वरती टोपी। टोपी मळवू नका॥८॥
टोपी वाचून टाहो फोडुन। भानुदास म्हणे॥
टेंशन टेंशन
टेंशन टेंशन, टेंशन टेंशन॥धृ॥
याचं टेंशन, त्याचं टेंशन। इथलं टेंशन, तिथलं टेंशन॥१॥
मागचं टेंशन, पुढचं टेंशन। आजचं टेंशन, उद्याचं टेंशन॥२॥
घरचं टेंशन, दारचं टेंशन। शाळेचं टेंशन, ऑफिसचं टेंशन॥३॥
बसचं टेंशन, ट्रेनचं टेंशन। जायचं टेंशन, यायचं टेंशन॥४॥
उठायचं टेंशन, झोपायचं टेंशन। नडतंय टेंशन, पिडतंय टेंशन॥५॥
नामाचं स्मरण घालवतं टेंशन। भानुदासाला तुमचं टेंशन॥६॥
सियाराम
सियाराम, राधेशाम। सियाराम, राधेशाम॥धृ॥
सियाराम के दास बने तो, बन जाओ हनुमान॥१॥
कृष्ण कन्हैया की भक्तिमे, बन जाओ सुदाम॥२॥
रामचंद्र के निकट चले तो, बन जाओ भनुबाण॥३॥
देवकीनंदन के होठोंसे, बन जा मुरली तान॥४॥
भानुदास अद्वैत बने तो, हो गये अंतर्धान॥५॥
आम्ही गृहस्थाश्रमीचे संन्यासी
आम्ही गृहस्थाश्रमीचे संन्यासी॥धृ॥
देह दिला देवाजीने। सांभाळितो त्यासी॥
देह झिजे कार्यासाठी। चित्त देवापाशी॥१॥
पत्नी, मुलं, सुना दिल्या। धर्माने आम्हासी॥
मायेच्या हो पंखाखाली। सावरितो त्यासी॥२॥
कर्तव्यभावाने केले। सार्या संसारासी॥
नित्य कर्म केले आम्ही। सोडोनी फळासी॥३॥
कर्म कृत्य केले सारे। त्यागुनी तयासी॥
पाण्यामध्ये मासा जसा। स्पर्श ना अंगासी॥४॥
बुद्धी, मन, चित्त वाही। गुरुचरणासी।
भानुदास झाला आता। अजब संन्यासी॥५॥
contact us
naambhajanaamrut@gmail.com
+91-9987264949
© 2025. All rights reserved.